२०२६ या वर्षातील विशेष मुहुर्त, तिथी, ग्रहयुती आणि शुभ/अशुभ दिवस :-
२०२६ या वर्षातील विशेष मुहुर्त, तिथी, ग्रहयुती आणि शुभ/अशुभ दिवस
नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा!
- २०२६ वृद्ध व्यक्तींसाठी, विशेषतः वृद्ध पुरुषांसाठी शुभवर्ष आहे आणि नवतरुण युवतींना(वय वर्ष १२ ते १८) फारसे चांगले नाही.
- २०२६ हे वर्ष पर्यटनविशेष वर्ष असेल. पर्यटनाशी संबंधित प्रगतीकारक घडामोडी या वर्षात घडतील. पर्यटनातून मिळणाऱ्या गेल्या पाच वर्षातील आर्थिक घडामोडींचा उच्चांक या वर्षात घडेल अशी स्पष्ट ग्रहदशा आहे.
- २०२६ मध्ये वित्तीय गुंतवणूक, न्यायव्यवस्था विषयक विशेष घडामोडी घडतील.
- २३ फेब्रुवारीपासून होणारी मंगळ राहू युती उष्णतामान वाढवेल. उष्णताविकार, रक्ताशी संबंधित व्याधी अशा ग्रहस्थितीत निर्माण होतात. त्यामुळे हा काळ सुरू होण्यापूर्वीपासूनच आरोग्य विषय जागरूक रहावे. भूगर्भातील घडामोडींना अशा स्थितीत वेग येतो. हा फार आपत्तीकारक, नुकसानदायक काळ नसला तरी जागरूक राहणे आवश्यक असते.२ एप्रिलपर्यंत हा काळ असेल.३ एप्रिलपासून १० मे पर्यंतचा काळ फार त्रासदायक काळ आहे. आरोग्य, वाहनप्रवास, पर्यावरण, सामाजिक उलाढाली, राजकीय उलाढाली, एकंदर सर्वच बाबतीत हा काळ त्रासदायक आहे.(त्रासदायक भाकिते करताना ज्योतिषाला कधीही आनंद होत नसतो.लोकांना सावध करणे हे प्रमुख कर्तव्य आहे.) या काळात अनावश्यक पर्यटन, वादग्रस्त बैठका, त्रासदायक कामे, कोर्टकचेरी, क्षमतेहून अधिक जबाबदाऱ्या घेऊ नयेत. आनंदी राहावे. दैनंदिन कामात मग्न राहावे. गर्भवती स्त्रिया, आजारी आणि वृद्ध माणसे यांनी विशेष जागरूक राहावे.
- १० फेब्रुवारी २०२६ पर्यंतचा काळ भारत देशाच्या प्रगतीसाठी अनुकूल काळ असेल. वृद्ध व्यक्तींना जागतिक स्तरावर यश कीर्ती मिळेल. विशेष संधी मिळेल.
- २०२७ मध्ये सूर्यग्रहण असून कालसर्पदोष निवारणार्थ पूजाकाळ पुढच्या वर्षी मिळेल.
- १४ मे पासून ८ जून पर्यंतचा काळ मिथुन राशीच्या सर्व व्यक्तींना शुभ आहे, विशेषतः विद्यार्थ्यांना!
- १ जूनपासून पुढील संपूर्ण वर्ष कर्क राशीच्या जातकांसाठी उत्तम आहे. तसेच, अशा व्यक्ती ज्यांच्या कुंडलीमध्ये कर्कराशी केंद्रात येत आहे अशा व्यक्तींसाठी हा काळ अतिशय शुभ असेल.
- २२नोव्हेंबर पासून ३० डिसेंबरपर्यंतचे ग्रहमान तुळ राशीसाठी शुभ आहे.
- १५डिसेंबरपासून पुढीलकाळ सत्ताधारी पक्षासाठी त्रासदायक ठरेल. २०२७च्या मार्च महिन्यात अनपेक्षित राजकीय घटना घडतील. सर्वसामान्य जनतेवर मात्र त्याचा विशेष परिणाम होणार नाही.
- गेल्या वर्षी भूकंप इत्यादी बरीच उलथापालत घडली. ते ग्रहांशी संबंधित होते का?तर नाही,त्याचा संबंध ग्रहांशी/ ग्रहदशेशी नाही. ग्रहदशेमुळेही भूकंप येतात पण फक्त ग्रहदशेमुळे येत नाहीत.
माणूस पृथ्वीच्या गर्भात फार शिरलेला आहे.२५मजली बिल्डिंग बांधायची असेल तरी सात मजले भूपृष्ठाखाली खणावे लागते.त्याचा परिणाम भूगर्भात होतो.भूगर्भात फक्त लावारसच नसतो तर वायूवहनाच्याही जागा असतात.पाण्याच्या प्रवाहाच्या दाबापेक्षा वायुप्रवाह दाब जास्त असतो. यासाठी भूगर्भात वेगवेगळ्या ठिकाणी अनुकूल पोकळी(कॅविटी) नैसर्गिकरित्या तयार झालेली असते.ज्यावेळी हा समतोल बिघडतो, भूगर्भावरील उलाढालीमुळे पोकळी सिमेंट काँक्रीट सारख्या बाह्यघटकांनी भरल्या जातात त्यावेळी भूकंप इत्यादी घटना पृष्ठभागावरती जाणवतात/ घडतात.
थोडक्यात काय तर २०२५ मध्ये आणि २०२६ मध्येही ग्रहदशेच्या प्रभावामुळे भूकंप इत्यादी येण्याची शक्यता फारशी नाही. २३ फेब्रुवारी ते १० मे या काळात सर्वसाधारण शक्यता असली तरी गंभीर भूकंप घडणारे नाहीत. || ओम साईराम ||
२०२६ मध्ये उत्तम दिवस आणि त्याज्य दिवस -
(उत्तम दिवस सर्व कार्यासाठी शुभ आहेत. त्याज्य दिवस टाळावेत.उर्वरित दिवस सर्वसाधारण चांगले आहेत.)
जानेवारी महीना
उत्तम दिवस : १,४,५,१२,१९,२०,२४,२५.
त्याज्य दिवस : १४,१५,१६,१७,१८,३१.
फेब्रुवारी महीना
उत्तम दिवस : ३,५,६,७,१८,१९,२०,२२, २५,२६.
त्याज्य दिवस : ९,१६,१७,२४
मार्च महीना
उत्तम दिवस : ५,७,१३,१४,१५,१६,१९,२०,२१,२४,२५,२६,२७,२८,२९,३०,३१.
त्याज्य दिवस : २,३,४,१७,१८,२३.
३ मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहण असून हे भारतामध्ये पाळायचे आहे. दुपारी ३वाजून १८ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल. दुपारची वेळ असल्याने भारतात दिसणार नाही परंतु वेध पाळायचे आहेत. संध्याकाळी ६वाजून ४८ मिनिटांनी हे ग्रहण संपेल. चंद्रोदयवेळी ग्रस्तोदित चंद्रोदय होईल.
या ग्रहणकाळात आठ वर्षाखालील लहान मुलांना विशेष करून जपावे.या काळात आवर्जून इष्टदेवतेचे पूजन करावे. मुद्दाम जागरण करायची आवश्यकता नाही. आनंदीत मनाने हा काळ व्यतीत करावा.गर्भवती स्त्रिया,आजारी व्यक्तींनी तीन मार्चच्या सकाळी साडेअकरापासून मनातल्या मनात प्रियदेवतेचा /इष्टदेवतेचा नामजप करत राहावे. हलके खाणे खावे. बाहेर जाणे,मोकळ्या आकाशाखाली जाणे टाळावे.आवश्यकतेनुसार झोप घ्यायला, मलमूत्रविसर्जन करायला हरकत नाही. कठीण अवजड कामे, दैनंदिन कामापेक्षा फार वेगळी असणारी कार्ये तसेच फार श्रमाची कामे करणे टाळावे. मांसाहार, अपेयपान, दुर्वर्तन आणि कठोर भाषण या काळात पूर्णपणे टाळावे. राग, दुःख, उद्वेग अशी गंभीर मन:स्थिती पूर्णपणे प्रयत्नपूर्वक टाळावी. ग्रहणकाळातील हे नियम सर्व व्यक्तींनी पाळणे लाभदायक आहे. गर्भवती स्त्रिया, आजारी व्यक्तींनी आवर्जून पाळावेत. गर्भवती स्त्रिया आणि ग्रहणकाळाविषयी अधिक माहिती आम्ही प्रकाशित केलेल्या आध्यात्मिक गर्भसंस्कार या पुस्तकामधेआहे.
एप्रिल महीना
उत्तम दिवस : १,२,३,४,१०,११,१३,१५,१८,१९,२०,२१,२३,२५,२६,२७ , २८,२९,३०.
त्याज्य दिवस : ५ आणि १७.
मे महीना
उत्तम दिवस : ३,७,११,१३,१८,१९,२१,२५ आणि २८.
त्याज्य दिवस : २,५,१५,१६,१७,३०.
१७ मे पासून १५ जूनपर्यंत अधिक ज्येष्ठमास आहे. हा काळ श्रीहरीविष्णू उपासनेमध्ये व्यतीत करावा. खगोलीय चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा ताळमेळ पृथ्वीच्या पूर्ण प्रदक्षिणेच्या ३६५ दिवसांशी बसावा यासाठी सुमारे तीन वर्षातून एकदा अधिकमास भारतीय हिंदू पंचांगात समाविष्ट केला जातो. खगोलशास्त्र आणि फलज्योतिषशास्त्र एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खगोलशास्त्राप्रमाणे फलज्योतिषशास्त्रालाही वैज्ञानिक अधिष्ठान आहे. मात्र ज्ञानापेक्षा गैरसमज आणि अंधश्रद्धा समाजात अधिक जलद प्रसृत होतात. पूर्वापार चालीरीती जपणे प्रशंसनीय असले तरी अधिकमासाविषयी ज्याला मलमास किंवा धोंडमास असे बोलीभाषेत म्हणण्याची पद्धत आहे त्याविषयी कोणतीही भीती मनात बाळगू नये. अधिकमासात जन्मलेले मुल अशुभ नसते. अधिकमासात प्रवास, शस्त्रक्रिया, नोकरी अर्ज धोकादायक किंवा वाईट ठरत नाहीत. अधिकमासात शक्यतो धार्मिक शुभकार्ये केली जात नाहीत परंतु तसेच काही विशेष परिस्थिती, निकड असेल तर विवाह गृहप्रवेश इत्यादी करणे धोक्याचे मुळीच नसते.
जून महीना
उत्तम दिवस : ४, ११,१७,२३,२४,२७.
त्याज्य दिवस : १,१३,१४,१५ आणि २२.
पर्जन्यमान - गेल्या बावीस वर्षांहून अधिक काळापासून आपण वृत्तपत्रांमधून आणि आपल्या वेबसाईटवरून पाऊस कसा असेल याचे भाकीत, पूर्वसूचना आम्ही नियमितपणे दरवर्षी लिहीत आलेलो आहोत. हवामानखात्यापेक्षा आपला अंदाज अचूक असतो. अलीकडे गेल्या चार वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सॅटॅलाइटद्वारे केले जाणारे पर्जन्यमानाचे भाकीत तंतोतंत आणि अचूक असते. त्यामुळे यावर्षीपासून पर्जन्यमानाचे भाकीत करण्याची आवश्यकता नाही असे आम्ही जाहीर केले. मात्र, अनेक वाचकांनी आणि आमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या आमच्या क्लाइंट्सने आम्हाला पर्जन्यमानाविषयी लिहावे असा आग्रह केला. त्यांच्या आग्रहाचा मान राखला. यावर्षी पर्जन्यवृष्टीचे काही महत्त्वाचे पॉईंट्स पुढील प्रमाणे आहेत -
• नक्षत्रानुकूलता असल्याने मे महिन्यात वळवाच्या पावसाची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपासूनच काळे ढग आकाशात दिसतील. मे महिन्याच्या प्रारंभापासून विविध ठिकाणी वळवाचा पाऊस, वादळी पाऊस पडेल. कोकण किनारपट्टीत याची शक्यता कमी आहे.
• सर्वसाधारणपणे, जूनच्या एक किंवा दोन तारखेला पुन्हा वीजा आणि वादळी पावसाची शक्यता आहे. पर्जन्यवृष्टी होईल.ज्यांच्या विहिरीला पाणी नाही अशा व्यक्तींनी दहा मे ते दहा जून काळात शिवउपासना करावी. भूगर्भातील मोकळ्या वेगवान झालेल्या जलस्त्रोतांना हे आवाहन असते. यामुळे पुढील बारा महिने अखंड झरा राहतो. पुढील उन्हाळ्यातही झरे वाहतात.
• जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला मध्यम स्वरूपाची सुरुवात होईल. सुमारे दहा दिवस हा पाऊस असेल.
• त्यानंतर पाऊस थोडी विश्रांती घेऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा सुरुवात करेल. हलक्या वेगवान सरी घेऊन येणारा पाऊस पूर्ण जुलैमध्ये पडेल. अनिश्चित वातावरण, तब्येतीच्या तक्रारी, मात्र पर्यटनास, पावसाळी सहलीस अनुकूल असा हा पाऊस असेल. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साधारण गुरुपौर्णिमेदरम्यान भरपूर पावसाला सुरुवात होईल आणि असा अव्याहात पाऊस पूर्ण दोन महिने असेल. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळात भरपूर पाऊस पडेल. हा पाऊस काही प्रमाणात शेतीसाठी नुकसानदायक ठरेल. शेतकऱ्यांनी पूर्वतयारी करावी. महाग विशेष हायब्रीड पिकांची लागवड पेरणी लावणी या काळात करू नये.तसेच सर्वसामान्य पिकांची - जी पिके प्रतिकूल वातावरणात तग धरून राहतात - लागवड करताना पन्नास टक्केच करावी. उर्वरित लागवड पेरणी सप्टेंबर दरम्यान करावी. यामुळे मोठे नुकसान टळेल.शेतीची कामे ऑगस्ट,सप्टेंबरला घेतलेली चांगली. विशेषत: कोकणातील पावसाळी शेतीसाठी हा बदल आवश्यक आहे.
• यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत पर्जन्यवृष्टी असेल. त्यानंतर लगेचच थंड वाऱ्यांना सुरुवात होईल. यावर्षी भारताच्या उत्तर भागातील थंड प्रदेशात आणि हिमालय पर्वतरांगांमध्ये बरीच उलथापालत होईल. तेथे राहणाऱ्या माणसांना याचा त्रास झाला तरी उर्वरित भारतीयांना यापासून विशेष धोका नाही.
जूलै महीना
उत्तम दिवस : १,२,४,५,७,८,९, १५,१६,१९,२४,३०आणि३१
त्याज्य दिवस : १४,१७,२३.
ऑगस्ट महीना
उत्तम दिवस : २,३,४,६,९,१४,२४,२६.
त्याज्य दिवस : ७,१२,१९,२१ आणि २८.
सप्टेंबर महीना
उत्तम दिवस : २,४,५,१३,२०,२१,२३.
त्याज्य दिवस : ३,९, १०,११,१९,३०.
२६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर हा पितृपंधरवड्याचा काळ आहे.पौर्णिमेला मृत झालेल्या व्यक्तींचे कार्य २६सप्टेंबरला करावे.पितृकार्याखेरीज इतर कार्यांसाठी हा काळ टाळावा.पितृपक्ष म्हणजे अशुभकाळ नसतो, तर पितृकर्मांसाठी राखून ठेवलेला काळ असतो. सर्व सण-समारंभांपूर्वी सर्व पितरांना तृप्त करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत असे शास्त्रात सांगितले आहे.या पितृकर्माच्या राखीव काळात इतर कोणतीही धार्मिक कार्ये करू नयेत, आपले चित्त पितृक्रिया, पिंडदान या विधींकडेच लावावे यासाठी पितृपक्ष असताना इतर कोणतीही धार्मिक कार्ये करू नयेत. अचानक शस्त्रक्रिया,दूरचा प्रवास, बदली,बढती किंवा मोठी जवाबदारी ठरल्यास घाबरून जाऊ नये.अंधश्रद्धा ठेवू नका, जाणकार व्हा.
ऑक्टोबर महीना
उत्तम दिवस : ११,१२,१९,२०,२१,२४,२६,२९,३० आणि ३१ .
त्याज्य दिवस : १०,१३,१७,१८,२८
८नोव्हेंबरला लक्ष्मीकुबेर पूजन असले तरी विवाह, वास्तुशांती, वाहन खरेदी इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण शुभकार्यासाठी हा दिवस टाळून केवळ पूजापाठामधेच व्यतीत करावा.
नोव्हेंबर महीना
उत्तम दिवस : १,६,७,१०,१५,१६,१९,२१,२२,२५,२६,२८ आणि २९.
त्याज्य दिवस : ८,९,१३,१८,३०.
डिसेंबर महीना
उत्तम दिवस : २,४,५,११,१२,१४,१५,१७,१९,२०,२३,२५,३० आणि ३१.
त्याज्य दिवस : ७,८,१०.
.
* तिथी,वार,नक्षत्र,कारण,योग या पाच घटकांच्या आधारे पंचांग मांडले जाते.त्याचा सण,उत्सव,संतांच्या जयंती याच्याशी नसतो.
* उत्तम दिवशी विशेष पुजा, विवाह, जावळ, विशेष खरेदी, विशेष प्रवास, मंगलकार्ये, शस्त्रक्रिया, कार्यारंभ, बँकेत खाते खोलणे, वृक्ष लागवड, होम-हवन इत्यादी आर्वजून करावे. सर्व शुभकार्यासाठी योग्य.
* त्याज्य दिवस मात्र वरील गोष्टींसाठी पूर्णपणे टाळावेत. मात्र त्याज्य दिवसांचा संबंध वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, परीक्षा, मुलाखती, दैनंदिन प्रवास आणि दैनंदिन कामांसोबत जोडू नये.